Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : सत्कार सोहळे नको, तुमची कामे सांगा; पालकमंत्री म्हणून बीडमध्ये येताच धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर..!

ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी  

हार तुरे आणि सत्कार सोहळे नको, मला तुमचं काम करू द्या असे म्हणत, गावागावातील सत्कार टाळत फक्त निवेदने स्वीकारत बीडकडे प्रवास केला. नेहमी हार, तुरे, पुष्पगुच्छ आदींनी भरलेली धनंजय मुंडे यांच्या गाडीची डिक्की आज मात्र निवेदनाच्या थप्पीने भरलेली दिसत होती. धनंजय मुंडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र बीड जिल्हा वासीयांना खरी प्रतीक्षा होती ती मुंडे यांच्या पालकमंत्री पदी नियुक्तीची..!

दोन दिवसंपूर्वी धनंजय मुंडे यांची बीडच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच ते अहमदनगर येथील ‘शब्दगंध’ या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बीडकडे निघाले असता, आष्टी तालुक्याच्या हद्दी पासून जागोजाग गावोगावी लोक रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभे होते. धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून फुलांनी भरलेल्या जेसीबी बाजूला काढायला लावून, ‘तुमचे हार तुरे नको, आता मला काम करू द्या, कामाची निवेदने द्या’ असे म्हणत हार तुरे नाकारले.

बीड जिल्ह्याच्या हद्दीवर दौला वडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबा देवी फाटा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्कार नाकारून केवळ निवेदने स्वीकारली, यावेळी सोबत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, आष्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल अप्पा सानप यांसह अनेक पदाधिकारी सोबत होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version