Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : बीडच्या सभेपूर्वी अजितदादांनी जिल्ह्यातील विकासकामांबाबत केली लोकप्रतिनिधींशी चर्चा; बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला मिळणार ‘गिफ्ट’..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय  दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित व तातडीची कामे तसेच दुष्काळी परिस्थिती संदर्भात माहिती दिली. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत.

दरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात महापारेषण व संचालन विभागाकडील प्रलंबित विषयासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्याही बैठकीस बीड जिल्ह्यातील आजी, माजी आमदार व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माजलगाव धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्रास पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात देखील आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी याआधीही सांगितले होते. त्याला अनुसरून मंत्रालयात बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात विविध बैठकांचे सत्र सुरू आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version