बीड : प्रतिनिधी
राजकीय वर्तुळात मोठे खळबळ उडवणारी धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत आपल्या कुटुंबियांसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले. सकाळी उशीर झाल्यानंतरही ते उठले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीत गेले. तर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
दरम्यानच्या काळात त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
भगीरथ बियाणी हे बीड जिल्ह्यातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठा जमाव केला होता. या घटनेचा सखोल तपास बीड पोलीस करत आहेत.