Site icon Aapli Baramati News

BEED BREAKING : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; बीड जिल्ह्यात माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या चारचाकीवर दगडफेक..!

ह्याचा प्रसार करा

गेवराई : प्रतिनिधी

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या चारचाकीवर गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे आज सायंकाळी मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. बदामराव पंडित हे मोहिमाता देवीच्या दर्शनासाठी आले असताना ही घटना घडली.

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता देवीची सध्या यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे आज सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांसह मोहिमाता देवीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर परिसरात आपली चारचाकी लावून बदामराव पंडित आणि कार्यकर्ते दर्शनासाठी मंदिरात गेले. दरम्यान, या मंदिराशेजारीच मराठा क्रांती मोर्चाकडून उपोषण सुरू आहे.

काही आंदोलकांनी बदामराव पंडित यांच्या चारचाकीवर दगडफेक केली. यामध्ये चारचाकीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अचानक घडलेल्या या घटनेनंतर या ठिकाणी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर बदामराव पंडित हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले. दरम्यान, या प्रकरणी कोणतीही पोलिस तक्रार दाखल झालेली नाही.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version