Site icon Aapli Baramati News

बबन लोणीकर यांना ‘ती’ ऑडिओ क्लिप भोवली; अखेर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

भाजप आमदार बबन लोणीकर यांना ऑडिओ क्लिप चांगलीच भोवली आहे. त्यांच्याविरोधात जालना पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण अभियंत्यास धमकी देताना दलित समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बबन लोणीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बुधवारी ( दि. ३० मार्च) बबन लोणीकर यांनी एका महावितरण अभियंत्यास धमकी देताना दलित समाजाबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर समाजमाध्यमांवर बबन लोणीकर यांच्याविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. बबन लोणीकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही विविध संघटनांनी केली होती. अशातच जालना काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांच्या फिर्यादीवरून दलित समाजाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे बबन लोणीकर यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी मोबाईल वरून फोन करून महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना धमकी दिलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये बबन लोणीकर यांनी महावितरण अभियंत्याला धमकी देताना ‘झोपडपट्टीवर जा, दलित वस्तीवर जाऊन त्यांचे आकडे काढा’ असे शब्द वापरले होते. त्यामुळे बबन लोणीकर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version