जालना : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यावर आता शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे पंचवीस आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करीत भाजपमधील ‘त्या’ आमदारांना सुरक्षित कसे ठेवता येईल याचा विचार करा असा टोला लगावला आहे.
अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जालन्यातील पंचायत समितीच्या कार्यालयाचे लोकार्पण पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. दानवे यांचे वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा झाला आहे. सत्ता नसल्यामुळे भाजपचे आमदार नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी घालवण्यासाठी म्हणून ते खोटे बोलत आहेत. उलट भाजपचेच २५ आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
दानवे अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या भेटीत महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु महाविकास आघाडीत कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. ते जे निर्णय घेतील तोच अंतीम निर्णय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.