जालना : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं असून याचा आज पाचवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारला चर्चेसाठी दारे उघडी आहेत. दोन दिवस मी बोलू शकतो. त्यामुळे येत्या दोन दिवसात काय बोलायचे ते बोला. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडलं म्हणून समजा अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशातच आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीही बिघडत आहे. त्यांनी आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधत सरकारला चर्चेसाठी येत्या दोन दिवसांचा वेळ असल्याचं सांगितलं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांनी वैद्यकीय उपचारही नाकारलेले आहेत.
आरक्षण देणार नसाल तर तुम्हाला मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचा तरी जीव गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. त्यामुळं मी आंदोलन थांबवणार नाही असं स्पष्ट करून जरांगे पाटील म्हणाले, माझ्या हृदय आणि किडणीवर परिणाम होईल असं डॉक्टर सांगतात. परंतु हे टाळायचं असेल तर सरकारने तात्काळ आरक्षण द्यावं. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडलंच म्हणून समजा असं सांगत मला काही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
चर्चेला येवू दिलं जात नाही असं कारण सरकार पुढे करत आहे. परंतु दोन दिवस मी चर्चेसाठी तयार आहे. माझं शरीर मला दोन दिवस साथ देईल. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यानंतर तुम्ही रट्टे खाण्यासाठी येणार आहात का असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील यांनी दोन दिवस चर्चेसाठी वेळ दिला. कुणाला तरी जीव धोक्यात घालावा लागेल तेव्हाच समाजाचं कल्याण होईल. दु:खही झालं नाही पाहिजे आणि न्यायही मिळाला पाहिजे असं होत नसतं. कोणी तरी दु:ख भोगल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही. तुम्ही थोडे दिवस थांबा हा फक्त दूसरा टप्पा आहे.सरकारला आरक्षण द्यावेच लागेल असेही त्यांनी नमूद केले.