मुंबई : प्रतिनिधी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही निवडणूक विविध मुद्यांमुळे चर्चेत होती. आता या विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनोख्या शब्दांत ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. या विजयाचे श्रेय पश्चिम बंगालच्या वाघिणीलाच द्यावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बंगालच्या जनतेला हिंमतबाज आणि ममता बॅनर्जी यांना वाघिणी असे संबोधत त्यांनी अनोख्या पद्धतीने या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्याचवेळी आता राजकारण संपले असेल तर सर्वांनी मिळून कोरोना विरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया आशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपला चिमटे काढले आहेत.
“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.