पुणे : प्रतिनिधी
हे सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणूक प्रचारात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थिर असून सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
आज पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार बदलण्याच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे.
कोरोनानंतर निवडणूक घेतली असती तरी चाललं असतं..!
मुळात सद्यस्थितीत निवडणुका व्हायलाच नको अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही सहकार विभागांतर्गत येणाऱ्या निवडणुकांना मुदतवाढ दिली असे सांगून अजित पवार म्हणाले, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यामुळे साहजिकच आम्हालाही यात भाग घेणे आवश्यक होते. त्यानुसार आम्ही उमेदवार उभा केला. आता उमेदवार उभा केल्यानंतर घरात बसून प्रचार करू शकत नाही.
लस निर्यात करणं गरजेचं नव्हतं
खरं तर सध्याच्या संकट काळात आपल्याला राजकीय भाष्य करायचे नाही. परंतु निर्माण झालेली टंचाई पाहता कोरोना लस किंवा रेमडिसेवर लस निर्यात करण्याची गरज नव्हती. मात्र ती केली गेली आणि आता आपल्याला टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आता असे बोलले तरी मी राजकीय बोललो असे म्हणून टीका होणार असा टोलाही त्यांनी लगावला.