
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कायदेशीर लढा सुरू झाला आहे. शिंदे गटासह महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल दिशा यामुळे ठरणार आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता मनसेची एन्ट्री झाली आहे. विलीनकरणाचा विषय समोर आलाच तर मनसे हा पर्याय निवडण्याबाबत बंडखोर आमदारांची चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधत याबाबत चर्चा केल्याची माहितीही समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नोटिसा काढत आज सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या १६ आमदारांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व घडामोडीदरम्यान, एकनाथ शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल अशी चर्चा होत होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडात मनसेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हा सत्ता संघर्षाचा अंक किती दिवस सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.