मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राज्य सरकारमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ‘राज्यसभेच्या निवडणुकीमधून उमेदवारी मागे घ्यावी यासाठी ही भेट घेण्यात आली.
राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील, तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पार्श्वभूमीवर काँगेस नेत्यांनी काल रात्री फोनवरून भाजप नेत्यांशी चर्चा केली. अशा पोटनिवडणुका बिनविरोध होतात, अशी परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचीही हीच भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही पोटनिवडणूक लढवली जावी असा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे माघार घेता येणार नसल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
काल रात्री फोन वरून झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही पोटनिवडणूक व्हायला नको, अशी आमची मागणी आहे. जरी महाराष्ट्रात राजकीय संघर्ष चालू असला; तरीसुद्धा कोणत्या वेळी विरोधकांना कशी मदत करायची हे अलिखित संकेत आहेत. फडणवीसांनी आम्ही केलेल्या मागणीवर विचार करून कळवू असे सांगितले आहे, असे स्पष्टीकरण कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.