मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील मंत्र्यांची निवासस्थाने गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.
राज्यभरातील शिवप्रेमींनी राज्यातील मंत्र्यांच्या निवासस्थानाला प्रसिद्ध गड, किल्ल्यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता. त्यांच्या प्रस्तावाला अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे आता राज्यातील दुकानांच्या पाट्या बरोबरच मंत्र्यांच्या निवासस्थानांची सुद्धा नावे बदलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाचे नाव बदलणार का, असा सवाल सगळयांना पडला होता. मात्र, मलबार हिल परिसरात नावे बदललेल्या बंगल्याचा समावेश होत नाही. कदाचित या परिसरातील बंगल्याचा विचार केला जाऊ शकतो.