Site icon Aapli Baramati News

दिलखुलास अजितदादांची चिमुकल्या मुलींच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं..! वाचा कशी झाली अजितदादांची छोटीशी मुलाखत..!

ह्याचा प्रसार करा

चिपळूण : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जितके शिस्तप्रिय आणि कडक आहेत तितकेच प्रेमळ आहेत, याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. आजही त्यांच्यातील दिलखुलास व्यक्तीमत्व पहायला मिळालं ते चिपळूणमध्ये लहानग्या मुलींनी घेतलेल्या मुलाखतीच्या निमित्तानं..!

आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे चिपळूण दौऱ्यावर होते. आमदार शेखर निकम यांच्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या चिमुकल्या विद्यार्थींनींनी अजितदादांची मुलाखत घेतली. त्यावेळी अजितदादांच्या दिलखुलास स्वभावाची प्रचिती उपस्थित सर्वांनाच आली.

या चिमुकलींची अजितदादांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याचवेळी या चिमुकल्या विद्यार्थीनींनी दादा आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, विचारु का..? अशी विनंती केली. त्यावर दादांनीही तुम्हाला काय विचारायचे आहे असं सांगत त्यांना परवानगी दिली. या चिमुकलींच्या पहिल्याच प्रश्नाने उपस्थितांसह दादांची कळी खुलवली.

दादा, आम्ही शाळेत पोहोचायच्या आधी तुम्ही मंत्रालयात कसं पोहोचता हा भाबडा प्रश्न या चिमुकलींनी विचारला.. त्यावर एकच हशा पिकला.. या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा म्हणाले, आमचे मोठे साहेब आहेत ना शरदराव पवार, त्यांना आम्ही लहानपणापासून पाहतोय. ते सकाळी किती वाजता उठवतात, किती वाजता कामाला सुरुवात करतात. त्यांचा दिनक्रम कसा असतो हे आम्ही पहायचो.

मोठे साहेब लोकांचे प्रश्न कसे सोडवतात, त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे. ते लोकांच्या कामासाठी सकाळी सातलाच तयार व्हायचे हे सगळं आम्ही पाहिलंय.. म्हणून आम्ही तीच सवय लावून घेतली. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी लवकर मंत्रालयात जातो आणि त्यातून एक समाधान मिळतं असं दिलखुलास उत्तर अजितदादांनी दिलं..

दादा तुमचा आवडता खेळ कोणता अशीही विचारणा या चिमुकलीनं केली. फक्त राजकारण सोडून काय आवडतं असंही विचारलं.. त्यावर मला क्रिकेट आवडतं, पत्ते खेळायला आवडतं, पण वेळच मिळत नाही अशी तक्रारही अजितदादांनी केली. आम्ही लहानपणी विटी दांडू खेळायला आवडायचं, गोट्या खेळायला आवडायचं, पतंग उडवणं आवडायचं.. असं सांगतानाच आता आयुष्य वेगवान झालंय, त्यामुळं हे खेळ कालबाह्य झाल्याचंही अजितदादांनी सांगितले.

हे तर क्रिकेट बघायला कुठेही जातात..

यावेळी सोबतच असलेल्या खासदार सुनिल तटकरे यांना क्रिकेटची फार आवड असल्याचं अजितदादांनी आवर्जून सांगितले. ते क्रिकेट पाहण्यासाठी कुठेही जायला तयार असतात असं म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

एरवी अजितदादांकडे शिस्तप्रिय आणि कार्यमग्न नेते म्हणून पाहिलं जातं. मात्र आज दिलखुलास अजितदादांनी चिमुकलींशी मनमुराद संवाद साधत त्यांच्यातला ‘प्रेमळ’ स्वभावही दाखवून दिला. त्यामुळेच त्या चिमुकलींसह उपस्थितांना अजितदादांची ही स्टाईल भावली नसेल तरच नवल..!


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version