Site icon Aapli Baramati News

MAHAD BLAST : महाडच्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत स्फोट; सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश, छिन्नविछिन्न मृतदेह पाहून नातेवाईकांचा आक्रोश

ह्याचा प्रसार करा

महाड : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत काल स्फोट झाला आहे. त्यामध्ये जवळपास अकरा कामगार बेपत्ता झाले असून यापैकी सात जणांचे मृतदेह काढण्यात एनडीआरएफ पथकाला यश मिळाले आहे. दरम्यान, हे मृतदेह पाहिल्यानंतर संबंधित कामगारांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत संबंधित कंपनी मालकावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

महाड येथील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये शुक्रवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता स्फोट होऊन सात कामगार जखमी झाले होते. तर अकरा कामगार दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भयानक स्फोटात संपूर्ण कंपनीचं स्ट्रक्चरच आगीत जाळून खाक झालं. त्यामुळे या कंपनीमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले होते. या पथकाने काल रात्रीपासून मदतकार्याला सुरुवात केली.

आज सकाळी या कंपनीतून जळालेल्या अवस्थेतील सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या भीषण आगीत जळाल्याने मृतदेहांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. त्यामुळे आता प्रशासनाला मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. या दुर्घटनेत महाड तालुक्यातील तळीये, चोचींदे खरवली व पडवी या ठिकाणचे स्थानिक कामगार दगावले आहेत. याशिवाय काही राज्यातील व परप्रांतातील कामगारांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनीबाहेर मोठी गर्दी केली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची अवस्था पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दुसरीकडे या घटनेनंतर अद्याप कोणावरच कारवाई झालेली नाही. त्यामुळे कंपनीबाहेर जमलेल्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या कंपनीच्या मालकाला पकडून समोर आणा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी या नातेवाईकांनी केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version