Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : माझ्या विचारांचा सरपंच निवडून द्या; अन्यथा निधी मिळणार नाही : नितेश राणेंनी धमकावलं..!

ह्याचा प्रसार करा

कणकवली : प्रतिनिधी

सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १८ डिसेंबरला मतदान होत असल्याने प्रचारही ऐन रंगात आला आहे. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट ग्रामस्थांना धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. माझ्या विचारांचा सरपंच निवडून नाही आला तर निधी मिळणार नाही. तुम्ही याला धमकी समजा किंवा काहीही समजा, मुख्यमंत्रीही मला विचारल्याशिवाय निधी देत नाहीत असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

कणकवलीत बोलताना नितेश राणे यांनी हे विधान केले आहे. माझ्या विचारांचे सरपंच निवडून द्या. चुकूनही जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही, तर मी एकही रुपया निधी देणार नाही एवढी काळजी नक्की घेईल. याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा. माझे गणित स्पष्ट आहे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

सगळा निधी माझ्या हातात आहे हे मतदान करताना लक्षात ठेवा. जिल्हा नियोजनचा निधी असो की ग्रामविकासचा,  २५-१५ चा निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. मी सरकारचा म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाचा आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असोत. ते कुणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत, असे विधान राणे यांनी केले आहे.

नितेश राणे यांनी थेट मतदारांनाच धमकावल्यामुळे राज्यात आता नवीन वाद पेटण्याची चिन्हे आहेत. यावरून आता विरोधकांनी राणे यांच्यावर टीकेला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हा वाद चांगलाच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version