Site icon Aapli Baramati News

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी   

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या  यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा मूलगा नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी रात्री उशीरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर बुधवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ५७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील राजभवनाच्या नावावर ‘आयएनएस विक्रांत’ जहाज वाचविण्यासाठी गोळा केलेल्या कोट्यवधीच्या निधीचे सोमय्या यांनी काय केले, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

‘आयएनएस विक्रांत’ जहाज वाचविण्यासाठी २०१३-१४ किंवा २०१४-१५मध्ये राजभवनाच्या नावावर गोळा करण्यात आलेले पैसे राज्यपालांकडे जमा करण्यात आले काय, अशी विचारणा माहितीच्या अधिकाराखाली धीरेंद्र उपाध्ये यांनी केली होती. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे राज्यपालांच्या कार्यालयाने त्यांना लेखी उत्तरात दिल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version