
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने संचारबंदी लागू करत विविध निर्बंध लावले आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध क्रिकेट खेळणं मुंबईतील तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. संचारबंदीचे उल्लंघन करत विनामास्क क्रिकेट खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहाजणांपैकी एकाला मुंबईच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्यामुळे या बहद्दर क्रिकेटपटुची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे.
मुंबई उपनगरातील एका रस्त्यावर मोहम्मद कुरेशी आणि त्याचे मित्र रस्त्याच्या मधोमध क्रिकेट खेळत होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली. मात्र कारवाईपासून वाचण्यासाठी पळून गेलेल्या या युवकांचे मोबाईल विसरले. त्यामुळे ते पुन्हा घेण्यासाठी आल्यानंतर त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यामुळं मुंबई पोलिसांनी मोहम्मद कुरेशीसह त्याच्या साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
त्यामध्ये मोहम्मद कुरेशी याला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यामुळे त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे सांगत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजीत नांदगावकर यांनी जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या तरी मोहम्मद कुरेशी याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यभर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत विनामास्क रस्त्यावर क्रिकेट खेळणे हे नियमांची पायमल्ली करणारे कृती आहे. त्यामुळे मोहम्मद कुरेशीचा जामीन अर्ज फेटाळत असल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले आहे.