सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सतीश सावंत हे कुणाच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आणि काय काम करत आहे हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे. संस्था उभा करायला आणि त्या संस्था चालवायला डोके लागते. त्यासाठी अक्कल लागते. परंतु त्या संस्था बंद करायला अक्कल लागत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक पार्श्वभूमीवर सहकार समृद्धी पॅनलच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, बँक प्रत्येक जिल्ह्याची आर्थिक नाडी असते. त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये पक्षीय राजकारण टाळले पाहिजे. एखादी संस्था उभा करायला डोके लागते. त्यासाठी अक्कलही असावी लागते. मात्र उभ्या केलेल्या संस्था पाडायला अक्कल लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यात अग्रेसर बँक आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य उमेदवारांना संधी देवून बँकेच्या प्रगतीला साथ द्यावी, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.
खासदार आणि आमदार होणे सोपे आहे. मात्र जिल्हा बँकेचे निवडणूक लढवणे अवघड आहे. निवडणुकीत गाफील राहु नका, विरोधकांचे पाठबळ पहा आणि त्यांच्या दादागिरीला घाबरू नका. योग्य व्यक्तीच्या हातामध्येच बँक द्या. सिंधुदुर्ग बँकेची अवस्था बीड, उस्मानाबाद, नांदेडच्या बँकेसारखी होऊ देवू नका, असेही अजित पवार यांनी नमूद केले.