इंदापूर : प्रतिनिधी
विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून चार जण मातीखाली गाडले गेल्याची घटना इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे घडली आहे. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चारही व्यक्ती बेलवाडी गावचे रहिवाशी असून सदरील विहीरीचे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप आता होत आहे. याबाबत तहसीलदारांकडे तक्रारही करण्यात आली असून संबंधित विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
काल रात्री इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील एका विहीरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून चार कामगार गाडले गेल्याची घटना घडली. यामध्ये सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती सावंत (सर्व रा. बेलवाडी, ता. इंदापूर) हे चार कामगार अडकले आहेत. प्रशासनाच्या वतीने रात्रीपासूनच या कामगारांची शोध मोहीम राबवण्यात येत आहे.
या घटनेनंतर एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले असून त्यांच्याकडूनही या कामगारांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या चारही कामगारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली असून या घटनेमुळे त्यांना दु:ख अनावर झाले. तब्बल १२७ फुट खोल असलेल्या या विहीरीत हे काम सुरू होते. सध्या प्रशासनाकडून या चौघांना शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही.
दुसरीकडे या विहीरीचे कामच बेकायदेशीर असल्याची बाब आता समोर आली आहे. विहीर मालकामुळे चार कुटुंबप्रमुखांचा जीव धोक्यात आला असून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेलवाडीच्या सरपंच मयूरी जामदार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. या विहिरीचे काम बेकायदेशीर असल्याची तक्रार काही नागरिकांनी इंदापूरच्या तहसीलदारांकडे केली आहे. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केली आहे.