Site icon Aapli Baramati News

सुप्रिया राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं… ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उलगडलं गुपित..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यांच्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रीय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेकदा त्या संसदरत्न ठरल्या. मात्र सुप्रिया यांच्या राजकारणात येण्याविषयी शरद पवार यांनी मोठं गुपित उघड केलं आहे.

सकाळ समूहाला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पिता-पुत्रींची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या राजकारणात येतील याबाबत शंका होती असं सांगितलं आहे.

एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात…

यावेळी शरद पवारांची एक जुनी मुलाखत दाखवण्यात आली. त्यामध्ये शरद पवार यांनी म्हटलं होतं की, माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असं नाही. तिला इच्छा पण नाही. त्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही खळखळून हसले. यावर पवार म्हणाले की, सुप्रिया राजकारणात येईल असं वाटलं नव्हत असं मी म्हणलो. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल असेसमेंट कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल.

शरद पवार पुढं म्हणाले की, माझ्यावर झालेल्या संस्कारांचे श्रेय माझ्या आईचं. घरात कोणी शिक्षित नव्हते. पण आईनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझी स्त्रियांविषयी विचार करण्याची मानसिकता तेव्हापासूनच बदलली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी आयुष्याला संघर्ष म्हणून बघत नाही. आपण अपेक्षा मापात ठेवल्या तर आयुष्य समाधानात जातं.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version