Site icon Aapli Baramati News

मी अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जातोय.. भाजपच्या नेत्याचा दे धक्का

ह्याचा प्रसार करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक सुरू असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी अजितदादांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय असे कल्याणराव काळे यांनी जाहीर केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. दोन्ही बाजूने निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. अशातच कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यापूर्वी कल्याणराव काळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात साहेब सांगतील तसे काम करू असे सांगत पक्षांतराचे संकेत दिले होते. त्यानंतर आज थेट त्यांनी आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला या पोटनिवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. त्याचवेळी भाजपसाठी मात्र हा मोठा धक्का असणार आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version