कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना समाजात आनंद, उत्साह, बंधुत्वाची भावना घेऊन येतो. परस्परांशी प्रेमानं, संयमानं, आपुलकीनं वागण्याची शिकवण देतो. रमजान महिन्यातली प्रार्थना आणि उपवास जीवनाकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी देतात. गोरगरीबांच्या, मानवतेच्या कल्याणासाठी काम करण्याची, त्यागाची प्रेरणा देणारा हा महिना आहे. यंदाचा रमजान महिना सर्वांच्या जीवनात शांती, सुख, समृद्धी, भरभराट, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात की, रमजानचा महिना मुस्लिम बांधवांसाठी स्वयंशिस्त, संयम शिकवतो. विनाशकारी विचारांपासून, कृतींपासून दूर राहण्यास सांगतो. यंदा कोरोनाच्या संकटाशी लढताना सर्वांनी संयम, जबाबदारीनं वागण्याची गरज आहे. त्यासाठी तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तारसारखे कार्यक्रम घरीच साजरे करावेत. घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये, गळाभेटी, भेटीगाठी घेण्यापेक्षा नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोनवर शुभेच्छा द्याव्यात. ‘कोरोना’चे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना, सहकार्य करावे. कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करुन आपलं कर्तव्य पार पाडावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.