Site icon Aapli Baramati News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

ह्याचा प्रसार करा

पाडव्याचा सण कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा करा : अजितदादांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी 

“वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला गुढी पाडव्याचा सण सर्वांनी आनंदात, उत्साहात, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारतीय आणि मराठी संस्कृतीत गुढी पाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुचं आगमन होतं. झाडांची सुकी पानं गळून पडतात. नवीन पालवी फुटते. निसर्गातील या आशादायी बदलांचं उत्साहानं स्वागत करण्याचा हा सण आहे.

कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा सामुहिकपणे साजरा करता येत नसला तरी, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन यंदा गुढीपाडवा साधेपणानं साजरा करुया. कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा सर्वांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version