Site icon Aapli Baramati News

सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे कोविडविरोधी लढ्याला मोठी ताकद : उपमुख्यमंत्री अजित पवार

ह्याचा प्रसार करा

व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड रुग्णालयांना वितरण

मुंबई : प्रतिनिधी

राज्यावरील कोरोना संकटाचा सामना करताना सर्वांची एकजूट आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्वाचे आहे. लंडन येथील अरविंदजी शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने राज्यातील कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांमुळे राज्याच्या कोरोनाविरोधी लढ्याला ताकद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ. अरविंद शाह (लंडन) तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विभागीय सहनिबंधक आर. सी. शाह तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, डॉ. अरविंद शाह, मुकुल माधव फाऊंडेशन, ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन यांनी देशातील, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रुग्णांना पाठविलेली मदत कोरोनाविरोधी लढ्याला ताकद देणारी आहे. ही वैद्यकीय मदत रुग्णापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याबाबतची काळजी घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच लंडन येथील डॉ. अरविंद शाह यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले, अभिनंदन केले.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ग्रामीण रुग्णालय, संगमनेर तालुक्यातील एकलव्य आदिवासी संस्थेचे अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालय, मांची हिल, तसेच जीवदया मंडळ, संगमनेर नगरपरिषद कॉटेज हॉस्पिटल, पुण्याचे ससून रुग्णालय, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे जगदाळे मामा हॉस्पिटल आदी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version