मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेतल्या जातील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची आज बैठक झाली. या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या किंवा नाही याबद्दल चर्चा करण्यात आली.
सद्यस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास इंटरनेट सुविधेची अडचण आहे. ही बाब लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणेच योग्य राहणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
सद्यस्थिती लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सरकारला सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केली आहे.