Site icon Aapli Baramati News

GOOD NEWS : एसटी प्रवाशांसाठी ‘गुड न्यूज’, दिवाळीसाठी एसटी महामंडळाकडून १५०० जादा बसेस..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गावी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात १४९४ जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान या बसेस सुरू राहतील अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी, आषाढी यात्रा आदी सण-उत्सव कालावधीत जादा बसेसची सोय केली जाते. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टीअसल्यामुळे अनेक नागरिक कुटुंबियांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देतअसतात. त्याचवेळी नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे कर्मचारीही सणाच्या काळात आपल्या मूळ गावी जात असतात. या काळात एसटी प्रवाशांची संख्या मोठी असते.

सण-उत्सवाचा कालावधी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नेहमीप्रमाणे नियमित बस फेऱ्यांबरोबरच अधिकच्या १४९४ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने बसची संख्या वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई विभागातून २२८, नागपूर विभागातून १९५, पुणे विभागात ३५८, नाशिक विभागात २७४ आणि अमरावती विभागातून ७१ बस सोडण्यात येणार असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले.

मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या असून सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही चन्ने यांनी केले आहे. या बसेसला आरक्षणासह ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीही दिल्या जाणार असल्याचे चन्ने यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version