पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या काही आठवड्यापासून ५ टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा कोरोना बाधितदर ४.९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध आजपासून शिथिल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता सर्व हॉटेल, बार 50 टक्के क्षमतेसह सर्व रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेलमध्ये रात्री 9 पर्यंत ऑर्डर घेता येणार आहे. मॉल सुरू करण्यास परवानगी आहे, मात्र ग्राहक व स्टाफ यांनी दोन डोस घेतले पाहिजे. मॉल रात्री दहा पर्यंत सुरू दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल, दुकानांमधील सर्व कर्मचार्यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवसांचा कालावधी झालेला असावा आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिम, योगासेंटर, सलून, स्पा, रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत.
विवाह सोहळ्यांसाठी खुल्या प्रांगणातील, बंदिस्त मंगल कार्यालयातील संबंधित ठिकाणाच्या आसन व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेने व कोविड उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. खुल्या प्रांगणात क्षमतेच्या पन्नास टक्के जास्तीत जास्त दोनशे व्यक्तींना परवानगी तर बंदिस्त मंगल कार्यालयात पन्नास टक्के क्षमतेने जास्तीत जास्त शंभर व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तर चित्रपट गृहे बंद, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत.
आजपासून काय असेल सुरू..?
- सर्व दुकाने, हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार
- मॉल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश, मॉलमधील व्यवस्थापन, कर्मचार्यांचे सुध्दा लसीकरण झाले पाहिजे.
- एकमेकांचा संपर्क येईल असे क्रीडाप्रकार बंद राहणार आहे. मात्र इतर इनडोअर व आऊटडोअर क्रीडाप्रकार सुरु राहणार आहे.
सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार - विवाह सोहळ्यांसाठी परवानगी मात्र विवाह व्यवस्थेची संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक, कर्मचार्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक.