मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाची कोरोना आढावा बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक करण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार लवकरच पुढील आदेश पारित होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबईत बुधवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली होती. मात्र आता कोरोना रूग्णसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत या महिन्यातील रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने चालू करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
चार दिवसांपूर्वीच राज्यात पुन्हा निर्बंध लावणार जाणार नाही, अशी ग्वाही टोपे यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान काही भागातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. काही भागात अजूनही रुग्णसंख्या जास्त आहे. त्यामुळे तेथील रुग्णसंख्या कमी झाल्यास राज्यभरात हळुहळू निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.