पुणे : प्रतिनिधी
राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यासाठी पाच जणांची समिती नेमली जाणार असून राज्याचे मुख्य सचिव या समितीचे प्रमुख म्हणून काम पाहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लसीकरण, रेमडिसीव्हर इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कोव्हिड लसीकरण, रेमडिसीव्हर इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर काढायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यानुसार कोणती लस खरेदी करायची हे संबंधित कंपनी ठरवेल. त्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली जाईल. या समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी मुख्य सचिवांकडे असेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.