पुणे : प्रतिनिधी
राज्यात ओमीक्रॉनचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून नवीन निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. त्याचे तंतोतंत पालन करण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने आणि कोरोनाबाबत दक्षता घेऊन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कोरोनाबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये एका शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रातही ओमीक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने काल रात्रीपासून नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. हे निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.
कोरोनाची जबरदस्त किंमत महाराष्ट्रासह देशाला आणि जगाला मोजावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर ओमीक्रॉन व्हेरीयंटचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्या, कार्यक्रम आयोजित केले जातात. यालाही आवर घालून साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.