मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्याचवेळी नविन गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांना जबाबदारी देण्याचे आणि त्यांच्याकडील राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, तर कामगार खात्याचा कार्यभार हसन मुश्रीफ यांना देण्याबाबतही पत्र देण्यात आले आहे.
माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबिरसिंह यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यामध्ये सीबीआयमार्फत येत्या १५ दिवसात चौकशी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला..
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पत्र पाठवले आहे. तर गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे.
वळसे पाटील यांच्याकडे असलेल्या राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे तसेच कामगार विभागाचा कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्याबाबतही पत्रात नमूद करण्यात आले आहे.