Site icon Aapli Baramati News

आजारपणातून बाहेर पडताच धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल; म्हणाले.. नाऊ ऑल इज वेल..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा आपल्या मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली आहे. मागील मंगळवारी दि. १२ एप्रिल रोजी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात चार दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दोन दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर आज सोमवारपासून त्यांनी पुन्हा आपल्या कामकाजास सुरुवात केली.

दुपारी एकच्या सुमारास धनंजय मुंडे मंत्रालयात आले. त्यांनी विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे,  उपसचिव श्री दिनेश डिगळे,  खाजगी सचिव डॉ. प्रशांत भामरे यांच्यासमवेत विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली. मंत्रालयातील टपाल महत्त्वाच्या नस्ती यावर त्यांनी सह्या केल्या तसेच भेटावयास आलेल्या अभ्यागतांच्या भेटी घेतल्या.

आजारी असताना रुग्णालयातूनदेखील धनंजय मुंडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी सातत्याने ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे यासाठीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून डॉक्टरांना विनंती केली होती; मात्र संबंधित डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली नव्हती.

दरम्यान, आज धनंजय मुंडे पुन्हा कामकाजावर रुजू झाल्याने विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह मुंडेंच्या समर्थकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version