मुंबई : प्रतिनिधी
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चार दिवसात राज्य विकून टाकतील अशी घणाघाती टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. अजितदादांवरील टीका प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला भाबडेपणा असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
अंबरनाथ येथील एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. मुंडे म्हणाले, स्वतःची कसलीच किंमत नसलेल्या व्यक्तीने आपल्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःची किंमत वाढवण्यासाठी केलेला सवंग प्रयत्न म्हणजे अजितदादांवरील टीका आहे. प्रसिद्धी मिळावी याकरिता केलेला हा भाबडेपणा आहे.
दरम्यान, बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे सभागृहात प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवरून भाजपने प्रश्न उपस्थित करत टीका टिप्पणी केली.
अशातच भाजपाचे आ.प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पदभार अजित पवार यांच्याकडे द्यावा असे म्हटले. लाड यांच्या विधानानंतर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका करत अजित पवारांकडे मुख्यमंत्री पदाचा पदभार दिला तर चार दिवसात राज्य विकून टाकतील अशी टीका केली होती.