
पिंपरी : प्रतिनिधी
संसाराचा गाडा हाकत असताना पती-पत्नीमध्ये छोटेमोठे वाद होत असतात. मात्र त्यातही प्रेम लपलेलं असतं असं म्हणतात. मात्र पिंपरीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वयंपाक बनवण्यास झाल्याने पतीने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या संपुर्ण घटनेमध्ये पीडित महिला जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत जखमी पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित पतीला अटक केली आहे. बाबू उर्फ राहुल विठ्ठल पारधे (वय २८, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पती पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. शनिवारी पीडित महिलेला स्वयंपाक बनवण्यास उशीर झाला. त्यामुळे पतीला वेळेत जेवण न मिळाल्याने तो संतापला. त्याने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी राहुल पारधेला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत.