रायगड : प्रतिनिधी
हृदय हेलावून टाकणारी धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी परिसरात घडली आहे. १७ वर्षीय युतीला धमकी देत १८ ते २० नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची अमानुष घटना घडली आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून; पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी १० ते १२ आरोपी फरार असल्याची माहिती पुढे येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची एका हळदी समारंभात दोन तरुणांसोबत ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यातूनच त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर त्या तरुणांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी त्या पीडित अल्पवयीन मुलीला वारंवार धमकी देत आळीपाळीने बलात्कार केला.
दरम्यान, या प्रकरणात वीसहून अधिक आरोपी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी चालू आहे. तसेच या प्रकरणात आणखी १० ते १२ जण फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.