ठाणे : प्रतिनिधी
समाजात आपण अनेक हृदयद्रावक, मन हेलावून टाकणाऱ्या घटना बघतो. आईबाप आपल्या पोटच्या मुलासाठी झगडताना दिसतात; तर काही ठिकाणी तेच आईबाप मुलांच्या जीवावर उठलेले दिसतात. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. नवजात बालिकेला दीड लाख रुपायांमध्ये विकण्याच्या डाव ठाणे पोलिसांनी उधळून लावला आहे.
याबाबत माहिती अशी की, तीन मुलांच्या पाठीवर मुलगी झाली म्हणून नवजात बालिकेच्या जन्मदात्या आईवडिलांनी तिला विकण्याचा निर्णय घेतला. ही बाब ठाणे गुन्हे शाखेला समजल्यानंतर त्यांनी बनावट विक्रेता पाठवून हा कट उधळून लावण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मध्यस्थ महिलेशी संपर्क साधला.
पोलिसांच्या प्लॅननुसार दीड लाख रुपयांमध्ये या नवजात बालिकेचा सौदा झाला. संबंधित महिलेसह नवजात बालिकेच्या आईवडिलांना कॅसल मिल नाका येथील स्वागत हॉटेल येथे भेटण्याचे ठरले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत निष्ठुर आईवडिलांचा डाव उधळून लावला. या प्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आले आहे.
भिवंडीतील शांतीनगर येथील रिक्षाचालक वकील शकील अन्सारी (वय ३०) आणि त्याची पत्नी मुमताज अन्सारी या दांपत्यासह कायनात रिझवान खान(वय ३०. रा. मुंब्रा) मुज्जमिल रिझवान खान (वय १८ रा.मुंब्रा) दलाल झिनत राशिद खान ( वय २२, रा. मुंब्रा) वसीम इसाक शेख (वय ३६, रा. मुंब्रा) या सहा जणांवर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादंवि कलम ३७० आणि बालकांचा संरक्षण कायदा २०१५ च्या कलम ८०, ८१ नुसार या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक निरीक्षक योगेश काकड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रांत पालांडे, हरिष तावडे, भरत आरवंदेकर, पोलिस नाईक शब्बीर फरास, नंदकुमार पाटील, अमोल देसाई, दीपक जाधव, पोलीस शिपाई सागर सुरळकर, तेजश्री शेळके, मयुरी जाधव, पोलीस नाईक बाळू मुकाणे या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास राबोडी पोलिस करीत आहेत.