
अहमदनगर : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून जावयानं पत्नी, मेव्हणा, आणि आजी सासूचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील सावळीविहीर येथे घडली आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला असून जावयानं केलेल्या या हल्ल्यात सासरे,सासू आणि मेहुणी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
सुरेश निकम असं या माथेफिरू जावयाचं नाव आहे. या घटनेत त्याची पत्नी वर्षा सुरेश निकम (वय २४), मेव्हणा रोहीत चांगदेव गायकवाड (वय २६) आणि आजी सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय ७०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सासरे चांगदेव गायकवाड, सासू संगीता गायकवाड आणि मेहुणी योगीता महेंद्र जाधव हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन निकम या दोघांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, चांगदेव गायकवाड हे आपल्या कुटुंबियांसह सावळीविहीर गावातील विलासनगर परिसरात वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्रीच्या वेळी जावई सुरेश निकम हा त्यांच्या घरी आला. घरात येताच त्याने सुरुवातीला आजी सासू हिराबाई यांच्यावर चाकूने वार केले. हे पाहून पत्नी वर्षा आणि मेव्हणा रोहित पुढे येऊन त्याला अडवू लागले. त्यावेळी सुरेश निकम याने त्यांच्यावरही सपासप वार केले.
हा प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी आलेल्या सासरे चांगदेव गायकवाड, सासू संगीता गायकवाड आणि मेहुणी योगीता जाधव यांच्यावरही त्याने चाकूने वार केले. त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सुरेश निकम हा आपल्या चुलत भावासह पळून गेला.
या घटनेत आजी सासूचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मेव्हण्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या चांगदेव गायकवाड त्यांची पत्नी आणि मुलगी योगिता जाधव या तिघांवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. पोलिसांनी जखमींना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा कामाला लावत जावई सुरेश निकम याच्यासह त्याचा चुलत भाऊ रोशन निकम याला नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून नेमका हा प्रकार कशामुळे घडला आणि यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुरेश निकम याचा पत्नी वर्षासोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सुरेश व त्याचे कुटुंबीय वर्षाचा सतत छळ करत होते. त्यातूनच ती माहेरी आली होती. या दरम्यान, सुरेश हा वर्षाला नेण्यासाठी आला होता. परंतु एकूणच वागणूक पाहून वर्षाला घेऊन जाण्यास तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यातूनच या दोन्ही कुटुंबात वाद सुरू झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.