Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : जमीन खरेदीत फसवणूक झाली म्हणून पोलिसांची मदत मागितली.. पोलिस उपनिरीक्षकाची नियत फिरली अन केला असहाय्य महिलेवर अत्याचार..!

ह्याचा प्रसार करा

राहुरी : प्रतिनिधी

जमीन खरेदीच्या व्यवहारात फसवणूक प्रकरणात मदत मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर पोलिस उपनिरीक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात संबंधित पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नगर जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली असून एका महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नऱ्हेडा असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जमीन खरेदीत फसवणूक झाल्यामुळे पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सज्जनकुमार नऱ्हेडा याच्याकडे होता. हा तपास सुरू असताना संबंधित पोलिस उपनिरीक्षकाने पीडित महिलेला वेळोवेळी त्रास दिला. तसेच तिला धमकावून घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला असे या तक्रारीत नमूद केले आहे.

जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार देण्यासाठी ही महिला देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक नऱ्हेडा यांना संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानंतर नऱ्हेडा याने संबंधित पीडितेला खासगी प्रश्न विचारले. त्याचवेळी तुमचं काम केल्यावर मला काय देणार अशीही विचारणा केली. त्यावर संबंधित महिलेने ५० हजार रुपये देण्याचं मान्य केलं. मात्र मला काय हवंय ते तुम्ही समजून घ्या असंही या आरोपीनं म्हटलं.

या दरम्यान, नऱ्हेडा याने संबधित पीडितेच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन तू खूप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर अशा स्वरूपाचे मेसेज पाठवले. संबंधित पोलिस उपनिरीक्षक हा सातत्याने संबंधित महिलेला व्हॉटसअप कॉल व चॅटवरुन धमकी देत होता. त्यातूनच त्याने या महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी भादंवि कलम ३७६ क (ब) आणि कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संबंधित आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नगर जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. वर्दीची शान वाढवण्यासाठी अनेक अधिकारी प्रयत्नशील असताना पोलिस उपनिरीक्षक नऱ्हेडा याने केलेल्या कृत्याबद्दल तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version