दौंड : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी यवत महामार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन गॅस कटरच्या मदतीने फोडले होते. त्यातून २३ लाख ८० हजार ७०० रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीचा शोध घेत असताना पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
अजय रमेशराव शेंडे (वय.३२ रा.सहजपूर), शिवाजी उत्तम गरड (वय २५, रा. करंजी), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय २२, रा देवधाबुरा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे इतर दोन साथीदार फरार झाले आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे.
या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी बऱ्याच ठिकाणी घरफोड्या, मोटरसायकल चोरीसह एटीएम मशीन फोडले असल्याचे पुढे आले आहे. कुरकुंभ, यवत यासह अनेक ठिकाणी त्यांनी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे आरोपी युट्युबवर पाहून चोरी कशी करायची याची माहिती घेत होते. त्यासाठी आवश्यक साहित्य ते ऑनलाइन मागवत होते.
या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करत आहेत.