
यवत : प्रतिनिधी
भावाच्या अपघाताची खोटी माहिती देऊन एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खोर (ता. दौंड) या परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून बलात्कार करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला पतीच्या वाढदिवसानिमित्त एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. जेवण झाल्यानंतर बाहेर हॉटेलसमोर उभी असताना हॉटेलमधून एका अनोळखी व्यक्तीने बाहेर येऊन तिला तुझ्या भावाचा अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या आरोपींनी निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेला या आरोपींनी पुणे-सोलापूर महामार्गावरील सोडून देऊन ते पळून गेले.
या प्रकरणी पीडित महिलेने यवत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून केवळ २४ तासांच्या आत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अजय बापू चौधरी ( वय- २२,रा. खोर), शंकर संपत चौधरी (वय २६, रा खोर), किरण रोहिदास चौधरी ( वय- २७, रा.खोर), नवनाथ नाना कोकरे (वय ३२, रा. खोर) आणि संतोष भगवान चौधरी चव्हाण (वय ३२, रा.गिरीम) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे यवत परिसरात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस पुढील तपास करत आहेत.