Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : भाऊच ठरला वैरी; पाच महिन्यानंतर उलगडलेल्या भिगवणमधील खून प्रकरणाचं गूढ अद्याप कायम..!

ह्याचा प्रसार करा

भिगवण : प्रतिनिधी

पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील सुजीत संभाजी जगताप या युवकाचा चुलत भावानेच खून करून त्याचा मृतदेह पोत्यात टाकून पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र हा खून का केला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यामुळे आता भिगवण पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

किशोर बाळासाहेब जगताप (वय ३०, रा. शेटफळगढे) असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २१ ऑगस्ट २०२१ रोजी सुजीत जगताप हा चुलत भाऊ किशोर याने रानात बोलावले असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यामुळे त्याचे वडील संभाजी जगताप यांनी भिगवण पोलिस ठाण्यात सुजीत बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना सुरुवातीला धागेदोरे हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढत किशोर जगताप याला ताब्यात घेतले. सुरुवातीला किशोरने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने नियोजित पद्धतीने चुलत भाऊ सुजीत जगताप याचा खून केल्याची कबुली दिली. सुजीतला शेतात आल्यानंतर खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून पुरावा लपवण्यासाठी त्याचा मृतदेह पोत्यात टाकून निर्जन ठिकाणी उसाच्या शेतात पुरल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.

या प्रकरणी किशोर जगताप याच्यावर कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचा उलगडा झाला असला तरी सुजीत जगताप याच्या खूनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता ही गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, रुपेश कदम, सुभाष रुपनवर, नाना वीर, सचिन पवार, महेश माने, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे, आप्पा भांडवलकर, पोलिस मित्र अतुल माने, अनिल धवडे, सुहास पालकर यांनी ही कामगिरी केली.        


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version