पुणे : प्रतिनिधी
पुणे शहर पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी येथील शांतीनगर परिसरातील राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहर पोलिस दलाच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून शिल्पा चव्हाण या कार्यरत होत्या. यापूर्वी त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या. कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू असलेल्या शिल्पा चव्हाण यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग घेत गरजूंना मदत केली होती.
आज सकाळी शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याच्या वृत्तानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेनंतर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.