
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली पिंपरी महानगरपालिकेचे भाजपचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना या कारवाईमुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मोहम्मद तय्यब अली शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार केशव घोळवे यांच्यासह गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, अलका यादव आणि हसरत अली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोळवे यांनी व्यापाऱ्यांना पिंपरी चिंचवडच्या मुख्य बाजारपेठांमध्ये मेट्रोचे गाळे मिळवून देण्याचे आमिष दिले होते. त्यातून त्यांनी फिर्यादीकडून ५५ हजार रुपये उकळले आहेत. त्यानंतर घोळवे यांनी फिर्यादीकडे तब्बल १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने घोळवे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणानंतर फिर्यादीने तातडीने पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून मध्यरात्री घोळवे यांच्यासह चार जणांना अटक केली आहे. भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संघटनेसाठी घोळवे यांनी २०१९ पासून अनेक व्यापाऱ्यांना १ हजार २०० रुपयांची पावती करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर भाजपच्या उमाताई खापरे यांनी केशव घोळवे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांना या प्रकरणात विनाकारण अडकवून राजकीय दबावातून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर वरिष्ठांकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.