Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : पाटबंधारे कार्यालयातून लोखंडी बर्गे चोरणाऱ्या टोळीला दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी 

पाणी अडवण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी बर्गे चोरी करणाऱ्या एका टोळीतील चौघांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्वप्निल बाळू पोटे (वय २३, रा. बोरीबेल, ता. दौंड), गणेश राजू मोरे (वय २१, रा. बोरीबेल, ता. दौंड), अभिषेक प्रमोद निकम  (वय १९, रा. आलेगाव, ता. दौंड) आणि बाळू पांडुरंग पिंगळे  (वय ५४, रा. भिगवण बाजारतळ, ता. इंदापूर) या चौघांना दौंड पोलिसांनी अटक केली असून या टोळीतील तिघे जण फरार आहेत.

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील बोरिबेल येथील पाटबंधारे कार्यालयातून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी बर्गे चोरीला जात होते. सुरुवातीला या चोरीकडे कोणाचेच लक्ष नव्हते. मात्र कालांतराने या चोरीचे प्रमाण वाढल्याने ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. १७ जानेवारी २०२२ पूर्वी १९२ बर्गे चोरीला गेले होते. त्याची किंमत १६ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. 

पाटबंधारे खात्याच्या तक्रारीनुसार दौंड पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामध्ये एक टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बर्गे, विद्युत पंप, वापरण्यात आलेले ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने परिसरातील विद्युत पंप आणि सिमेंटच्या गोण्याची चोरी केल्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे. भिगवण येथील भंगार मालाचा व्यवसायिक पिंगळे हा चोरीचा माल विकत घेत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला देखील अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शहाजी गोसावी, सहायक फौजदार संतोष शिंदे, हवालदार महेंद्र लोहार, सुभाष राऊत, पोलिस नाईक निखिल जाधव, नारायण वलेकर, कॅान्स्टेबल किशोर वाघ यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version