पुणे : प्रतिनिधी
दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुंढवा येथे घडली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
कप्तान सिंग नायक (वय ३७, रा. केशवनगर मुंढवा) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर अंजली नायक (वय ३२) आणि साडू गजेंद्र नायक (वय ३७) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती-पत्नी मजुरी करून घर चालवत होते. मात्र काही दिवसानंतर पती दारूच्या आहारी गेला. दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करत होता. बऱ्याच वेळा दारू पिऊन पत्नीला रात्रभर मारहाण केली होती. रविवारी दुपारी पती कप्तान सिंग दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी अंजलीला मारहाण करू लागला. तेव्हा अंजलीने बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला. यानंतर पती उठत नसल्याचा खोटा बनाव करत गोंधळ केला.
घरमालक गोंधळ ऐकून घरी आल्यानंतर त्यांनी कप्तान सिंग याला उपचारासाठी दवाखान्यात नेले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि चौकशीनंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.