
पुणे : प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस आर्थिक गुन्ह्यात झपाट्याने वाढ होत आहे. या आर्थिक गुन्ह्यांमध्ये सायबर गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना कात्रज येथे घडली आहे. गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधण्याच्या नादात एका नागरिकाला पावणेदोन लाखांचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला आहे.
या प्रकरणी संबंधित नागरिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित नागरिक गुगल पे च्या मदतीने रिचार्ज करत होते. मात्र त्यांचा रिचार्ज अयशस्वी होत होता. त्यामुळे त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचे ठरवले. गुगलच्या साहाय्याने कस्टमर केअर नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना गुगलवर कस्टमर केअरचा नंबर मिळाला.
फिर्यादीने गुगलवर मिळालेल्या दोन नंबरवर संपर्क साधला. मात्र हे नंबर सायबर चोरट्यांनी टाकले होते. त्यांना चोरट्यांनी ‘एनीडेस्क’ हे ॲप डाउनलोड करावयास सांगितले. फिर्यादीकडून त्यांनी बँकेशी निगडित सगळी माहिती घेतली. त्यानुसार सायबर चोरट्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने १ लाख ७४ हजार ९६० रुपये काढून घेतले.
१९ आणि २० जुलै २०२१ दरम्यान ही घटना घडली. त्यांची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.