पिंपरी : प्रतिनिधी
सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आणि अश्लील भाषा वापरणाऱ्या स्वयंघोषित ‘थेरगाव क्वीन’ सह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली होती.
साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ (रा. थेरगाव) साक्षी राकेश कश्यप (रा. लिंकरोड चिंचवड) आणि कुणाल कांबळे (रा.गणेशपेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये ही तरुणी स्वतःला थेरगाव क्वीन समजून वावरत होती. इंस्टाग्रामवर लाइक्स मिळवण्याच्या नादात ती एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे भाषा वापरत होती.
काही दिवसांपूर्वी तिने ‘ नादी लागाल ३०२ कलम लावेल,’ असा व्हिडिओ शेअर केला होता. साक्षी आणि तिचे साथीदार मिळून धमकीवजा खालच्या पातळीची भाषा वापरून इंस्टाग्राम बनवत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरत होती.दिवसेंदिवस त्यांची ही मजल वाढतच चालली होती.
समाजातील मुलामुलींची नीती भ्रष्ट होण्यास आणि मानसिक स्थिती बिघडण्यास आरोपींची असे व्हिडिओ कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादिंनी केला आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत या तिघांनाही अटक केली आहे.