इंदापूर : प्रतिनिधी
यशवंत घरकुल योजनेचा २० हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या इंदापूर पंचायत समितीमधील सहाय्यक कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. केवळ ५०० रुपयांसाठी महिला कर्मचारीच एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अश्विनी गणेश भोंग (वय ३६, रा.इंदापूर) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. एका ३३ वर्षीय व्यक्तीने या महिला कर्मचाऱ्याबद्दल पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराला यशवंत घरकुल योजनेतून २० हजारांचा निधी मंजूर झाला होता.
२० हजारांचा धनादेश देण्यासाठी या कर्मचारी महिलेने ५०० रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज या कर्मचारी महिलेला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे, पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, भूषण ठाकूर, पोलीस शिपाई चालक प्रशांत वाळके यांनी ही कारवाई केली.