नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे शुक्रवारी ( दि.११ फेब्रुवारी) प्रेम प्रकरणातून प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने मारहाण करत प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेत तो प्रियकर ८५ टक्के भाजला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू होते. अखेर त्या प्रियकराचा व्हॅलेंटाईन दिनीच मध्यरात्री मृत्यू झाला आहे.
गोरख काशिनाथ बच्छाव ( वय३१) मृत्यू झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तो लोहोणेर येथे प्लंबिंग व्यवसाय करत होता. कल्याणी सोनवणे ( वय २३ रा. रावळगाव ता. मालेगाव) असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्रेम संबंध होते.यातूनच गोरखकडून कल्याणीकडे लग्नाची मागणी होऊ लागली होती. परंतु कल्याणीच्या कुटुंबीयांनी या लग्नास विरोध केला. त्यामुळे वाद निर्माण झाले होते.
दरम्यान, कल्याणीचे लग्न इतर ठिकाणी जमत असले तरी विवाहसंबंध गोरख मोडत असल्याचा संशय कल्याणीच्या कुटुंबाला येत होता. त्यामुळे शुक्रवारी साडे अकराच्या सुमारास कल्याणी आणि तिचे कुटुंबीय चर्चा करण्यासाठी लोहोणेर येथे गोरखकडे आले. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही.
या दरम्यान कल्याणीच्या कुटुंबियाकडून गोरखला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. बचावासाठी गोरख एका दुकानात शिरल्यानंतर कल्याणीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यामध्ये तो ८५ टक्के भाजला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू होते. अखेर मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.