Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : करणीच्या नावाखाली घातला ५० लाख रुपयांना गंडा..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

तुमच्या आईवर नातेवाईकांनी करणी केली आहे.त्यासाठी होमहवन करून बोकडाचा बळी द्यावा लागेल, असे सांगत एका भोंदूबाबानं एका महिलेची तब्बल ५० लाख ३० हजार रुपयांची फसणूक केली आहे. त्याचवेळी या भोंदूकडून पैसे मिळवून देतो असे सांगून एकाने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र बलराम कन्ना (वय ४५ वर्षे, रा. गंजपेठ) आणि मनीष बाबुराव शिंदे (वय ४२ वर्षे, रा.देहूरोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सोमवार पेठ, गंज पेठ येथे २०१८ ते २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. संबंधित महिलेच्या आईवर नातेवाईकांनी करणी केली आहे, असे राजेंद्र कन्ना याने सांगितले होते. करणी दूर करण्यासाठी होमहवन करून बोकडाचा बळी द्यावा लागेल असेही या महिलेला सांगण्यात आले होते.

या भोंदूने विश्वास संपादन करून या महिलेकडून वेळोवेळी ५० लाख ३० हजार रुपये घेतले. मात्र त्याचा काही फायदा झाला नसून आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. या दरम्यान, मनिष शिंदे याने या भोंदूकडून पैसे घेऊन देतो, असे आमिष दाखवत त्यांच्यासोबत अश्लील चाळे करून विनयभंग केला. याबद्दल कुणाकडेही वाच्यता केल्यास बघून घेवू असेही या महिलेला धमकावण्यात आले. त्यामुळे फिर्यादीने इतके दिवस तक्रार दाखल केली नव्हती. 

दरम्यानच्या काळात महिलेने धाडस करुन पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीसांनी या दोघांवर विनयभंग करणे, फसवणूक करणे, संगनमत करणे, धमकावणे, अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version